संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. भारतातील काही प्रमुख गावांच्या चंद्रोदयाच्या वेळा खाली दिलेल्या आहेत.
वक्रतुण्ड महाकाय,
सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव,
सर्व कार्येषु सर्वदा ।।
पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला 'भूस्वनंदा' या नांवानेसुद्धा ओळखले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिरातील गणेशाच्या दर्शनाने केली जाते.
श्री क्षेत्र मोरेश्वराची कथा | श्री मयुरेश्वरची कथा
आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादस्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले.
श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर
अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहे. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मूर्ति आहेत.
भारतातील काही प्रमुख गावांच्या चंद्रोदयाच्या वेळा खाली दिलेल्या आहेत.