asd
Sankashta Chaturthi
संकष्ट चतुर्थी
कृष्ण पक्षातील चंद्रोदय व्यापिनी चतुर्थीचे दिवशी हे व्रत केले जाते.
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्ट चतुर्थी' असे म्हणतात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. सायंकाळी अंघोळ करून अथर्वशीर्ष अथवा गणेशाचे जे स्तोत्र येत असेल ते म्हणत गणपतीची षोडशोपचार पूजा करावी, गणेशाला दूर्वा आणि लाल फूल प्रिय मानले जाते त्यामुळे या दिवशी पूजनामध्ये किमान २१ दूर्वांची एक तरी जुडी आणि लाल फूल वाहतात. गणेश पूजनानंतर त्यानंतर चंद्राची पूजा करावी, चंद्रदर्शनानंतर भोजन करून उपवास सोडावा. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने या व्रताने सर्व विघ्नांचा नाश होतो. मंगळ ग्रहाच्या अनेक नावांपैकी एक नाव अंगारक आहे. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता, अंगारक योग होतो. या चतुर्थीस अंगारक योग असेही नांव आहे. मंगळाच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या गणेशाने मंगळास आशीर्वाद दिला त्यामुळे या व्रतास विशेष महत्त्व प्राप्त झाले. दर महिन्याचे संकष्ट चतुर्थीचे व्रत न करणारे देखील अंगारक चतुर्थीचे व्रत आवर्जून करतात. अंगारक चतुर्थीच्या व्रताने संपूर्ण वर्षभरातील चतुर्थी केल्याचे फल मिळते, असे मानले जाते. भारतातील काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या वेळा खाली दिलेल्या आहेत.