दसरा
Dasara
दसरा
विजया दशमी, आश्विन शु. १०
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे यंदाच्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे दुपारी 2.00 ते 2.47 आहे तर दुपारी 2.26 ते 3.13 या दरम्यान आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही वेळ या दरम्यान येणार आहे. त्यामुळे 2.26 ते 2.47 या वेळेत आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गांवी असाल तरी विजय मुहूर्त असेल.

आश्विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये ।
स कालो विजयो ज्ञेयः सर्वकार्यार्थसिद्धये ।।


आपल्या शास्त्रात कोणतेही शुभकार्य विशिष्ट मुहूर्ताला करण्याला अतिशय महत्व देण्यात आले आहे. मुहूर्त पाहूनच कार्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार कार्याचा प्रारंभ केला जातो. वर्षभरात येणाऱ्या साडेतीन मुहूर्ताला तर अनन्यसाधारण महत्व असते. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, विजयादशमी आणि दिवाळीचा पाडवा हे वर्षातील साडेतीन मुहूर्त आहेत. यामध्ये गुढीपाडवा, विजया दशमी आणि दिवाळी पाडवा हे तीन मुहूर्त; तर अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तामध्ये अर्धा मुहूर्त. साडेतीन मुहूर्तांमध्ये दसरा अर्थात विजयादशमी हा अत्यंत शुभमुहूर्त मानला जातो.
दसरा हा सामान्यत: नवरात्राचा दहावा दिवस असतो. या दशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाशी युध्द करून विजय संपादन केला. पुराणकथेमध्ये शमीपत्रानी माझी पूजा केल्यास भक्ताच्या इच्छा पूर्ण होतील असा श्रीगणेशाने शमीवृक्षास वर दिलेला होता. शमी दुष्कृत्यांचा नाश करून मंगल करणारी असल्याने विजयादशमीस शमीपूजनास महत्व आहे. पांडवांनी वनवासात शमीच्या वृक्षात ठेवलेली शस्त्रे या दिवशी पुन्हा घेतली. दुर्गा देवीने महिषासुराशी 9 दिवस युध्द करून त्याला ठार मारले. त्या विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी.
विजयादशमीच्या दिवशी आठवा मुहूर्त हा विजय मुहूर्त असतो. विशेषत: या विजय मुहूर्ताच्या कालावधीत सुरू केलेली कामे यशस्वी होतात. अशा अनेक कारणांनी विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभमुहूर्त मानला जातो. दसऱ्यासारख्या शुभ मुहूर्तावर ज्याप्रमाणे नवीन कार्याचा आरंभ केला जातो. त्याप्रमाणे या मुहूर्तावर पूजनालाही महत्व देण्यात आले आहे. या दिवशी नवरात्राचे विसर्जन करून शमी व आपट्याचे पूजन करावयाचे असते. भारतीय संस्कृतीत सर्वांनाच यथायोग्य महत्व दिले आहे. पूर्वी प्रवास करण्यासाठी घोडा आणि हत्तीचा वापर होत असे. घोडा आणि हत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांचे पूजन करावयास सांगितले आहे. आजकाल वाहनांच्या जमान्यात वाहनांची पूजा करावी. कालमानाने असा जरूर तो बदल करावा; मात्र हेतु विसरू नये. दसऱ्याचा दिवस हा सर्व शुभकार्यांना प्रशस्त मानतात. दशमी तिथी श्रवण नक्षत्राने युक्त असेल, तर तो दिवस अतिशुभ होय. म्हणूनच दसऱ्याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानलेले आहे. दसरा हा भारतातील सार्वत्रिक सण आहे. सर्व जातीचे लोक हा सण साजरा करतात.
हा विजयाचा, पराक्रमाचा सण आहे. अर्जुनाने अज्ञातवासात शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराटाच्या गाई पळविणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी केली व विजय मिळविला, तो याच दिवशी. रामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तो याच दिवशी असे मानतात. या घटनांच्या संकेतामुळे या दिवसाला विजयादशमी, असे नाव मिळाले आहे.