विनायक चतुर्थी
गणेश उपासनेचे व्रत

प्रत्येक महिन्यातील शुक्ल चतुर्थीस विनायक चतुर्थी असे म्हणतात. श्रीगणेशाची उपासना करण्याचे हे व्रत आहे. गणेशाच्या अनेक अवतारांपैकी विनायक हा एक अवतार आहे. विनायक चतुर्थी व्रतासाठी मध्याह्नकाली असलेली चतुर्थी घ्यावी हा सामान्य नियम आहे.

हे व्रत करताना संपूर्ण दिवसभर उपोषण करून दुसरे दिवशी उपोषण सोडावयाचे असते. मंगळवारी विनायक चतुर्थी असताना अंगारक योग असतो. अंगारक योगाचे विशेष महत्त्व मानले आहे. विनायकी हे संकष्टीप्रमाणेच सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. पंचांगात विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थी असे उल्लेख असतात. या दिवशी गणेशपूजा हा प्रधानविधी असतो. मुख्यतः गाणपत्य संप्रदायाचे अनुयायी हे व्रत करतात. विनायक हे गणपतीचेच नाव आहे. या व्रतसाधनाने सर्व विघ्नांचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात. गणपतीची कृपा प्राप्त होते. संकटकाळी आपल्यावरील संकटाचा नाश होण्यासाठी हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात.

या दिवशी सर्व पूजा नेहमीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच मंत्र म्हणून करावी. उपचार समर्पण करताना 'श्री सिद्धिविनायकाय नमः।' असे म्हणून करावेत.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।