Shravan Masarambha
श्रावण मास

या महिन्याच्या पौर्णिमेच्या जवळ श्रवण नक्षत्र असल्याने श्रावण असे नाव या महिन्याला मिळाले आहे. वर्षा ऋतूचा हा पहिला महिना असून या महिन्यात बहुतेक दर दिवशी वार व्रते, धर्मकृत्ये सांगितली आहेत त्यामुळे या महिन्याला पवित्र श्रावणमास म्हणून महत्त्व दिले गेले आहे. पूर्वीच्याकाळी या मासाला नभस् असे देखील संबोधले जायचे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, वरदलक्ष्मीव्रत, श्रीकृष्ण जयंती, पिठोरी अमावास्या हे या मासातील प्रमुख सण-उत्सव आहेत.
श्रावण मासातील वार व्रते
रविवार :- श्रावण मासातील प्रत्येक रविवारी मौन धारण करून गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करावे.
सोमवार :- श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन, दिवसभर उपोषण व रात्री भोजन करावे. श्रावणातील सोमवारी नववधूने ५ वर्षे प्रत्येक सोमवारी, (शिवमुष्टी) ५ मुठी धान्य शिवावर वाहावे. प्रत्येक सोमवारी क्रमाने १) तांदूळ २) तीळ ३) मूग ४) जवस आणि ५ वा सोमवार असल्यास सातू हे धान्य शिवमुष्टी साठी घ्यावे.
मंगळवार :- (मंगळागौरी व्रत पूजन) विवाहानंतर पहिल्या श्रावण मासात पहिल्या मंगळवारी मंगळागौरी पूजन सुरू करावे, पहिल्या मंगळवारी व्यतीपात योग, भद्रा, क्षयदिन, करिदिन इ. कुयोग असताना आणि गुरू/शुक्रास्त असताना सुद्धा मंगळागौरी व्रत-पूजन सुरू करता येते. श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी नववधूने ५ वर्षे मंगलागौरीचे व्रत पूजन करावे आणि नंतर त्या व्रताचे उद्यापन करावे, पहिल्याच वर्षी करू नये. पूर्वीच्या काळी अशा प्रकारे ५ वर्षे हे व्रत म्हणून केले जात होते. पण गेल्या १०/१५ वर्षात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रमाण खूपच वाढल्याने व अन्य काही कारणांनी हे व्रत ५ वर्षे करणे ७५ % महिलांना शक्य होत नाही असे दिसते. विवाह झाल्यावर पहिल्या श्रावण महिन्यात एखाद्या सोईच्या मंगळवारी बहुतेकजण कार्यालयात मंगळागौर पूजन व गाणी म्हणून खेळ खेळण्यासाठी महिला मंडळांना बोलावून मोठा खर्च करून सोहळा साजरा करतात आणि नंतरचे मंगळवारी तसेच पुढील ४ वर्षे मंगळागौरी पूजन करतातच असे नाही आणि सध्याच्या काळात महिलांना शक्यही होत नाही आणि पुढे ४ वर्षे मंगळागौरी पूजन होत नाही. म्हणून ज्यांना ५ वर्षे पूजन करणे शक्य आहे, त्यांनी ५ वर्षे पूजा करताना प्रत्येक वेळेस काही जणींनी एकत्र येऊन पूजा करावी असे नाही, तर घरी साधेपणाने देवीची पूजा आणि त्या दिवशी उपवास करावा, असे ५ वर्षे करून नंतर उद्यापन करता येईल. तसेच दरवर्षी प्रत्येक मंगळवारी पूजन करणे शक्य होत नसेल तर दरवर्षी किमान एका मंगळवारी पूजन करून ५ वर्षांनंतर पंचवर्षात्मक पूजनाचे उद्यापन करता येईल. गुरू / शुक्र यांचा अस्त असेल तर त्यावर्षी उद्यापन करू नये. मात्र एखाद्या वर्षी श्रावण महिन्यात काही कारणांनी एकाही मंगळवारी पूजन करणे झाले नसता ते वर्ष धरू नये, त्यासाठी ६ व्या वर्षी मंगळागौरी पूजन करून नंतर उद्यापन करावे. गदोदर स्त्रीचे स्वास्थ्य ठीक असेल तर ९ व्या महिन्यापर्यंत मंगळागौरीचे पूजन करू शकते. मंगळागौरी पूजनाचे दिवशी एकादशी, संकष्ट चतुर्थी इ. चा उपवास असेल तर नैवेद्यामध्ये उपवासास योग्य असा एखादा पदार्थ करून तो पदार्थ प्रसाद म्हणून घेऊन फराळ करावा.
बुधवार :- श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध / बृहस्पतीचे पूजन करावे. बुद्धी चांगली राहण्यासाठी हे पूजन केले जाते.
गुरूवार :- श्रावणातील प्रत्येक गुरूवारी बुध / बृहस्पतीचे पूजन करावे. बुद्धी चांगली राहण्यासाठी हे पूजन केले जाते.
शुक्रवार :- श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवंतिकेचे पूजन करावे. ही बालसंरक्षक देवता आहे. पक्वान्नाचा नैवेद्य दाखवून सुवासिनी स्त्रीची ओटी भरतात. सध्याच्या काळात प्रत्येक शुक्रवारी पूजन केले जाते, पण एखाद्या शुक्रवारी पक्वान्नाचा नैवेद्य करून सुवासिनी स्त्रीची ओटी भरणे केले जाते. तसेच काही कारणाने परगांवी जावे लागणार असेल तर अशा वेळेस तो जीवंतिकेचा फोटो बरोबर घेऊन जाता येईल आणि ज्या घरी निवास असेल तेथे पूजन आणि विसर्जन करता येईल.
वरदलक्ष्मीव्रत :- श्रावण महिन्यातील वारव्रतांपैकी एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मीव्रत केले जाते.
शनिवार :- श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आपल्या चाली रीतीप्रमाणे शनि, मारुती, नरसिंह याचे पूजन केले जाते. एखाद्या शनिवारी मुंजा मुलाला भोजन दिले जाते.