छ. शिवाजी महा. जयंती (तिथिनुसार)
फाल्गुन कृ. ३

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज हैं ।

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिंच्छ बंस पर, सेर शिवराज है ॥ (कवि भूषण)

छ. शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तमरीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारीत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली.

पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मांतील साधुसंतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. मुंबई – लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात (१६ जानेवारी व १४ फेब्रुवारी १६७८) अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महराजांची तुलना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रेतर कवींनी विशेषतः तमीळ (सुब्रह्मण्य भारती), तेलुगू (कोमाराजू वेंकटलक्ष्मणराव), बंगाली (रवींद्रनाथ टागोर), गुजराती (झवेरचंद मेघाणी) हिंदी (केदारनाथ मिश्र) इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. म्हणून समर्थ रामदास म्हणतात –

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...

दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यांत शंका नाही.

छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी व कालखंड

१६३० फेब्रु. १९ - शिवाजीमहाराजांचा जन्म.

१६३६ - शिवाजीराजांची पुण्याकडे रवानगी.

१६४५ - हिंदवी स्वराज्याची शपथ; तोरणा घेतला; राजगड बांधला.

१६४६ जाने. २८ - महाराजांच्या मुद्रेचे पहिले उपलब्ध पत्र.

१६४७ - कोंढाणा घेतला.

१६४७ ऑक्टो. १९ पुरंदर किल्ला घेतला.

१६५६ जाने. १५ - जावळी घेतली.

१६५६ एप्रिल/मे - रायगड घेतला.

१६५९ नोव्हें. १० - अफझलखानाचा मृत्यू.

१६५९ नोव्हें. २८ - पन्हाळगड घेतला.

१६६० जुलै १२ - महाराज पन्हाळ्याहून निसटून गेले.

१६६१ मार्च - इंग्रजांची राजापूरची वखार लुटली.

१६६३ एप्रिल ५ - शायिस्तेखानावर लालमहालात छापा.

१६६४ जाने. ६-१० - सुरतेची पहिली लूट.

१६६४ जाने. २३ - शहाजीराजांचा मृत्यू.

१६६५ जून १३ - पुरंदरचा तह.

१६६६ ऑगस्ट १७ – आग्र्याहून सुटका.

१६६६ सप्टें. १२ - शिवाजीराजे राजगडास परत आले.

१६७० फेब्रु. ४ - तानाजीने सिंहगड घेतला.

१६७४ जून ६ – राज्याभिषेक

१६७४ जून १७ – जिजाबाईचा मृत्यु

१६७७ मे १३ – जिंजीचा किल्ला घेतला

१६८० एप्रिल ३ – महाराजांचा मृत्यू