
जेष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी शिवराज्याभिषेकोत्सव सोहळा संपन्न झाला आणि या दिवसापासून शिवशकाची सुरुवात झाली. आज शिवशक ३४९ चा प्रारंभ दिन, तिथीनुसार आज शिवराज्याभिषेकोत्सव दिन.
रयतेच्या या स्वतंत्र सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने राजधानी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, शिवराय आजच्याच दिवशी छत्रपति झाले.
मराठी संस्कृतीच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपति शिवाजी महाराजांनी जाहीर केले तो हाच दिवस. आपल्या स्वतंत्र राज्याची शिवशक ही नवी कालगणना याच दिवसापासून सुरु केली.
आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होन अशी मराठी लिपीतील नाणी चलनात आणली गेली. मराठी भाषेतील अनेक महत्वपूर्ण ग्रंथांचे पुनर्लेखन करवून घेण्यात आले, अनेक ग्रंथांची नव्याने निर्मिती करून घेतली गेली.
परकीयांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीची मराठी नावे दिली गेली. स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणांची आहुती दिली अशा सर्व सहकाऱ्यांचे स्मरण केले गेले. त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सत्कार केला गेला, एवढ्यावरच न थांबता आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता, संपूर्ण भारतात आणि जगभर पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशांविरूद्ध मोहिमांचा धडाका सुरु केला.
असा हा जगभरातील सर्व मराठी आणि हिंदू बांधवांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.