आषाढ शुद्ध एकादशीला शयनी किंवा महाएकादशी असें नांव आहे. या एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत श्रीविष्णू क्षीरसागरात शेषावर शयन करतात, अशी पौराणिक कथा आहे. शयनी एकादशीला विष्णुशयनोत्सव नांवाचा व्रतविधी करतात. याच दिवशी चातुर्मासाचा आरंभ होतो.
प्रत्येक चान्द्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११वी तिथी म्हणजे एकादशी. एकादशीलाच हरिदिनी असेही म्हणतात. या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवासाचं पारणं करतात.
एकादशीचे स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत. ज्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत, असे लिहिलेले असते. स्मार्त ही पूर्व दिवशी येते व भागवत दुसऱ्या दिवशी येते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीविद्ध (द्वादशीयुक्त) असते. वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात.
मध्ययुगात शूलपाणीने (इ. स. १३७५ - १४६०) एकादशी विवेक व रघुनंदनाने (इ. स. १६ वे शतक) एकादशीतत्त्व हे ग्रंथ केवळ एकादशीवर लिहिलेले आहेत. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्वविवेचन या ग्रंथांत शेकडो पाने एकादशीच्या विवेचनाची आहेत.
प्रत्येक चान्द्रमासात दोन, याप्रमाणे वर्षाच्या २४ एकादशी येतात. त्यांची नांवें पुढीलप्रमाणे - शुक्लपक्ष- (चैत्रापासून) कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा (प्रजावर्धिनी), जया (जयदा) व आमलकी. कृष्णपक्ष(चैत्रापासून) वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्तिला,विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादशींना कमला एकादशी असे नांव आहे.
आषाढ शुद्ध एकादशीला शयनी किंवा महाएकादशी असें नांव आहे. या एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत श्रीविष्णू क्षीरसागरात शेषावर शयन करतात, अशी पौराणिक कथा आहे. शयनी एकादशीला विष्णुशयनोत्सव नांवाचा व्रतविधी करतात. हे व्रत करायचा सर्वांना अधिकार आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी तें करावें. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणतात. यामध्ये श्रावण, भाद्रपद, आश्विन यापैकी एखादा अधिकमास आल्यास चातुर्मास ५ महिन्यांचा असतो. अधिक आषाढ असताना निज आषाढ महिन्यात चातुर्मास आरंभ होत असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मास्यारंभ होतो. शयनी एकादशीला देव झोपतात व प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात. याचा अर्थ असा की, आपले एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो. जसजसे वर जावे म्हणजे एका मितीतून (डायमेन्शनमधून) दुसऱ्या मितीत (डायमेन्शनमध्ये) जावे तसतसे काळाचे परिमाण बदलत असतें. हें आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आल्यावर त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. उत्तरायण हा त्या देवांचा दिवस आहे तर दक्षिणायन ही रात्र आहे. सामान्यतः आषाढ ते मार्गशीर्ष दक्षिणायन असते म्हणजे देवाची रात्र असते म्हणून देव शयन करतात. उत्तरायण सुरू होण्यापूर्वी म्हणजे दिवस सुरू होण्यापूर्वी कार्तिक शुद्ध एकादशीला देवांची पहाट सुरू होते. देव त्यावेळी उठतात म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी असे नांव आहे.
या शयन काळात आसुरी प्रवृत्तीची वाढ होत असते. अधिक खावे असे माणसांना वाटत असते. पण त्याचे परिणाम आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहेत. खरे असे आहे की, खाण्यावर जर माणसाने नियंत्रण ठेवले तर त्याची प्रकृति कधीहि बिघडणार नाही. धार्मिक भाग सोडला तर निसर्गाप्रमाणे हे चारही महिने पर्जन्याचे असतात. या काळात निरनिराळे रोग होतात. पचनशक्ती कमी होते. एका अभ्यासानुसार काही शे लोकांच्या चयापचयाचा अभ्यास केला असता एकादशीच्या दिवशी म्हणजे एकादशी तिथीच्या दिवशी मानवाचे चयापचय संपूर्ण पक्षात (महिन्यात दोन पक्ष) सर्वात कमी असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच उपवास, व्रते करण्यास सांगितले आहे. असुर याचा अर्थ येथे रोग, अनारोग्य घेण्यास हरकत नाही. आपल्या धर्मशास्त्रात सर्वच गोष्टी आरोग्य व हित यासाठी सांगितल्या आहेत. याचा विचार करणे आवश्यक आहे. चातुर्मासाचा पूर्वसुरींना अभिप्रेत असलेला अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. चातुर्मासातील व्रतवैकल्ये आपले पूर्वज मोठ्या श्रद्धेने करीत होते. त्याचे कारण यामागील विज्ञान त्यांना माहीत होते. विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान, आज आपण ते समजावून घेत नाही व त्यावर टीका मात्र करीत राहतो. हिंदु धर्मात व संस्कृतीत व्रत वैकल्ये, सणवार, उपासना, उपवास यांची पूर्वजांनी ऋतुपरत्वे अशी उत्तम सांगड घातली आहे की, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत नाही व आपले आरोग्य सांभाळले जाते. अमुक करावे हा विधि व अमुक करु नये हा निषेध. असे विधिनिषेध आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहेत. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान चातुर्मासात तरी ते पाळले जावेत म्हणजे आस्ते आस्ते नेहमीच संयमित वागता येईल. हा चातुर्मास्य व्रते सांगण्याचा शास्त्राचा हेतु आहे. आजकाल अनेक लोक Intermittent Fasting करताना दिसतात. अनेक आहार तज्ञ तसा सल्ला देखील देतात. Intermittent Fasting म्हणजे ठराविक दिवसांनंतर एक दिवस लंघन करणे, उपोषण करणे किंवा ते शक्य नसल्यास आहारात बदल करणे. पचायला हलके, थोडेसेच खाणे. धर्मशास्त्रानुसार आपण शैव, वैष्णव, गाणपत्य, देवी उपासक अशा भिन्न उपासनापद्धतीं पैकी कोणत्याही पद्धतीने उपासना करणारे असाल तरी दर पंधरा दिवसातून एकदा व्रताचा दिवस येतो आणि नैसर्गिकतेने उपोषण घडते. या पैकी कोणत्याही उपोषणाचे दिवशी संपूर्ण उपाशी राहणे अभिप्रेत नसते तर दिवसातून एकदा थोडेसे अन्न खाऊन एकदा पाणी प्यावे असे सांगितले आहे. एकादशी हे एक व्रत आहे आणि कोणतेही व्रत शारीरिक(उपास) वाचिक (जप करणे,भजन/कीर्तन करणे,स्तोत्रें म्हणणे) आणि मानसिक (परमेश्वराचें चिन्तन करणें) या तीनही पद्धतीने करावे असे धर्मशास्त्र सांगते. अशा पद्धतीने व्रताचे आचरण केल्यास अत्यंत लाभदायक ठरते.
संदर्भ - कालसुसंगत आचारधर्म, धर्मशास्त्रीय निर्णय, भारतीय संस्कृतिकोश, धर्मशास्त्राचा इतिहास