निर्जला एकादशी
दिनांक 10 जून रोजी निर्जला (स्मार्त) एकादशी व 11 जून रोजी भागवत एकादशी आहे.

बारा महिन्यांच्या चोवीस एकादशींना विशिष्ट नावे आहेत. उदाहरणार्थ कामदा, पुत्रदा, शयनी इत्यादि... ज्येष्ठ शुद्ध एकादशीस निर्जला असे नाव आहे. या नावावरून या एकादशीला काहीजण पाणीदेखील पीत नाहीत व खाणे तर नाहीच नाही, परंतु पुत्रवान गृहस्थी माणसाने काहीही न खाता उपोषण करू नये तर उपोषणाच्या पदार्थापैकी एखादा पदार्थ थोडा खाऊन एकदा पाणी प्यावे, असे शास्त्र आहे. निर्जला म्हणजे पाणीही न पिता उपोषण करावे, असा अर्थ नाही. या एकादशीचे महत्त्व मात्र अधिक आहे. या एकादशीचे व्रत केले असता वर्षभरातील सर्व बारा एकादशी केल्याचे पुण्य मिळते, असे शास्त्र आहे. एकादशीला व्रत करून द्वादशीस पारणा करण्यापूर्वी जलकुंभ, साखर व सोने सत्पात्री म्हणजे दान देण्यास योग्य व्यक्तीस दान द्यावे.

फल - दीर्घायुरारोग्य व स्वर्गप्राप्ती.

स्मार्त व भागवत एकादशी कशी ठरते ?

एकादशी :- प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षात एकादशी व्रत असते. भगवान विष्णूच्या (पांडुरंगाच्या) उपासनेसाठी हे व्रत केले जाते. एकादशीला संपूर्ण दिवसभर उपोषण करून दुसरे दिवशी पारणा करावी. एकादशी मध्ये स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत.

स्मार्त / भागवत एकादशी

वर्षातून २४ एकादशींचा उपवास असतो. त्यामध्ये ४-५ वेळा स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी अशा दोन प्रकारच्या एकादशी असतात. काही वेळेस सूर्योदयानंतर १ मिनिट देखील एकादशी तिथी नसताना द्वादशीचे दिवशी भागवत एकादशीचा उपवास कसा दिला जातो अशी शंका अनेकांना येते. सध्याचे काळात स्मार्त व भागवत (वैष्णव) असे दोन संप्रदाय आहेत. एकादशी व्रत स्मार्तांसाठी पारणा प्रधान आहे आणि भागवतांना उपोषण प्रधान आहे. पारण्यासाठी सूर्योदयास द्वादशी असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीचे दिवशी स्मार्तांनी उपोषण करावे. भागवतांना उपोषणाचे दिवशी दशमी वेध असू नये. दशमी वेध होत असेल म्हणजे एकादशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदयकाळी (१ ता. ३६ मि.) दशमी असेल तेव्हा दशमीविद्ध एकादशीचा दिवस सोडून द्वादशीचे दिवशी भागवत संप्रदायांनी एकादशी व्रत करावे असे आहे. अशा वेळेस त्रयोदशीचे दिवशी त्यांचे पारणे होईल हा मुख्य नियम आहे.

अ) एकादशीचा क्षय झाला तर दशमीचे दिवशी स्मार्त एकादशी आणि द्वादशीस भागवत एकादशी व्रत करावे.

ब) द्वादशीचा क्षय झाला तर दशमीचे दिवशी स्मार्त एकादशी आणि एकादशीचे दिवशी भागवत एकादशी व्रत करावे.

क) द्वादशीची वृद्धी असेल तेव्हा एकादशीचे दिवशी स्मार्त एकादशी आणि अहोरात्र असलेल्या द्वादशीचे दिवशी भागवत एकादशी व्रत करावे.

ड) एकादशीची वृद्धी असता अहोरात्राचे दुसरे दिवशी असलेल्या एकादशीस स्मार्त आणि भागवत संप्रदायांनी एकाच दिवशी एकादशी व्रत करावे.

एकादशीचे दिवशी कर्त्याला उपवास नसेल तर सत्यनारायणाची पूजा करता येते. देवाला उपवास नसतो, देवाची उपासना चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी मनुष्याने उपवास करावयाचा असतो. इतरांनी उपवास असल्यास तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसरे दिवशी घ्यावा.

।। विठ्ठल आरती ।।

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव .....

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।। जय देव .....

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव .......

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय देव ......