गुरु प्रतिपदा
माघ कृष्ण प्रतिपदा

माघ कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असे म्हणतात. हा दिवस दत्तभक्तांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो. श्रीनृसिंहसरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभां नंतरचे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.

वऱ्हाडातील लाडकारंजे हे नृसिंहसरस्वतींचे जन्मगाव होय. यांच्या पित्याचे नाव माधव आणि आईचे अंबाभवानी असे होते. त्यांचे नाव शालग्राम देव असे ठेवले गेले होते; पण लोक त्यांना नरहरी अशा नावाने हाक मारीत. हेच त्याचे नाव पुढे रूढ झाले. नरहरी सात वर्षांचा होईपर्यंत बोललाच नाही. त्यामुळे आपला मुलगा मुका निघणार, अशी आई-वडिलांना भीती वाटू लागली. त्यावर उपचार म्हणून त्यांनी सातव्या वर्षीच नरहरीचे मौजीबंधन करायचे ठरवले. त्या संस्कारात गायत्रीमंत्राचा उपदेश होऊन तो जेव्हा मातेकडे भिक्षा मागण्यासाठी गेला, तेव्हा त्याने वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली. तेव्हा पासून त्याचे मुकेपण संपले. वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्याने बदरीकेदारच्या यात्रेचे प्रस्थान ठेवले. वाटेत काही दिवस ते काशीक्षेत्री राहिले. संन्यासग्रहणानंतर नरसिंहसरस्वतींनी वाराणशीत काही काळ ज्ञानदानाचे कार्य केले. पुढे केदारयात्रा पुरी झाल्यावर या सर्व शिष्यांसमवेत त्यांनी दक्षिणयात्रेला प्रारंभ केला. ते प्रथम करंजनगरास आले. तिथे त्यांनी आपल्या माता पित्यांची आणि बंधूंची भेट घेतली. तिथून त्र्यंबकेश्वर व नासिक या क्षेत्रांच्या यात्रा करून ते परळी वैजनाथ इथे गेले. इथे ते एक वर्ष एकांतवास करून राहिले. त्यानंतर चार महिने औदुंबर क्षेत्री त्यांचे वास्तव्य झाले. तिथून पुढे ते कृष्णा-पंचगंगा संगमावरील अमरापूर या गावी गेले. इथे त्यांचे वास्तव्य बारा वर्षे होते. त्यांच्या या प्रदीर्घ निवासामुळेच त्या स्थानाला नरसोबाची वाडी असे नाव प्राप्त झाले. अमरापुराहून ते गाणगापुरी गेले. तिथे त्यांनी चौवीस वर्षे वास्तव्य केले. गाणगापूरच्या निवासात त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. तिथे त्यांनी अनेक चमत्कार केले व पुष्कळांची दुःखे दूर केली. त्यामुळे त्यांच्या दैवी सामर्थ्याचा प्रत्यय आलेले अनेक जण त्यांची सेवा करू लागले. त्यानंतर नरसिंहसरस्वती सिंहस्थाच्या यात्रेसाठी परत नासिक-त्र्यंबकेश्वरला गेले. या यात्रेहून परत आल्यावर त्यांनी गाणगापूरच्या लोकांचा निरोप घेतला आणि आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले.

माघ कृष्ण प्रतिपदेला नृसिंहसरस्वती कर्दळीवन येथे गुप्त झाले. या दिवशी आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराजांनी कर्दळीवन येथे जाण्यासाठी आपल्या प्रिय शिष्यांना निरोप दिला व अंतर्धान पावले. हा दिवस गुरुप्रतिपदा म्हणून पूजला जातो.

श्रीगुरुचरित्र ग्रंथाविषयी -

श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. हा दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ सरस्वती गंगाधराने लिहिला आहे. या ग्रंथातील शब्दा शब्दाला मंत्राची योग्यता आहे, असे मानले जाते. या ग्रंथाचा रचनाकाला इ. स. १५३५ हा मानतात. प्रस्तुत ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ आहे. पहिला अध्याय मंगला चरण, सुरुवातीच्या अध्यायात दत्तावतारचरित्र, ५ ते १० श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र, ११ ते ५१ श्रीनरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि बावन्नावा अध्याय अवतरणिका असा या ग्रंथाचा विस्तार आहे. अवतरणिकेचा अध्याय नंतर जोडला गेला असून, मूळ गुरु चरित्र ५१ अध्यायांचेच होते, असे अभ्यासकांचे मत आहे. गुरुभक्ती आणि प्रसाद हे या ग्रंथाचे दोन प्रमुख विशेष होत. दोन दत्तावतारांच्या चरित्रांशिवाय प्रसंगाप्रसंगाने आचारधर्म, सतीधर्म, गुरुभक्ती, व्रते, तीर्थे, इ. अनेक विषय सरस्वती गंगाधराने त्या वेळच्या महाराष्ट्री भाषेत लिहिले आहेत.