घटस्थापना, नवरात्रारंभ
शारदीय नवरात्र

यावर्षी नवरात्र आठ दिवसांचे - या वर्षी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी चित्रा आणि वैधृति योग असला तरी घटस्थापना तिथिप्रधान असल्याने गुरुवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १:४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल.

दिनांक 10 रोजी रविवारी ललिता पंचमी असून दिनांक 12 ला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. दिनांक 13 रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा असून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी गुरुवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला शुक्रवारी दसरा आहे.

यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाचे वर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाले आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा अर्पण कराव्यात. तिथीचा क्षय असताना एकाच दिवशी दोन माळा अर्पण करू नये. त्यामुळे यावर्षी आठच माळा अर्पण कराव्यात.

यंदाचे वर्षी कोरोनाच्या संकटामुळे किंवा अशौचामुळे ज्यांना 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर किंवा 13 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 14 रोजी नवरात्रोत्थापन करावे.

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9:48 पर्यंत सप्तमी असली तरीही मध्यरात्री अष्टमी तिथी मिळत असल्याने त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी 13 ऑक्टोबर रोजी आहे.

विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 15 ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी १४:२१ ते १५:०८ या दरम्यान आहे.

नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची नेहमी प्रमाणे रोज पूजा केली पाहिजे. नवरात्र बसविल्यानंतर ज्या देवतेचे नवरात्र असेल त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान, इ. उपचार करावेत आणि इतर देवतांना नेहमीप्रमाणे ताम्हनात घेऊन अभिषेक स्नान, इ. उपचार करुन स्वतंत्रपणे पूजा करावी. काही ठिकाणी नवरात्र बसविल्यावर इतर देवांची पूजा करीत नाहीत हे योग्य नाही.

प्रकृति अस्वास्थ्य किंवा वयोमान, इ. मुळे नवरात्राचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर बसता-उठता दोन दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा.

नवरात्र किंवा इतर उपवासाचे दिवसांत अशौच आले तर उपवास करता येतो. परंतु विशिष्ट संख्यात्मक उपवास असताना त्या संख्येमध्ये तो मोजू नये.

नवरात्र बसविल्यावर अशौच आले तर सप्तशती पाठ बंद करावेत अशौच संपल्यावर राहिलेले पाठ पूर्ण करावेत. मात्र नवरात्राचे उपवास करता येतील. नवरात्राची पूजा, माळ, दिवा, इ. उपचार शेजाऱ्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून करुन घ्यावेत. नवरात्रोत्थापन सुद्धा ब्राह्मणांकडून किंवा अशौच नसलेल्या नातेवाईकांकडून करावे. अशुचि घरातील साहित्य वापरु नये.

अशौचामुळे नवरात्रातील काही दिवस पूजेसाठी मिळत असतील तर अशा वेळेस 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 1 दिवसाचे नवरात्र करता येते, पंचांगात अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो.

नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी पर्यंत केले जाणारे धार्मिक कृत्य. अशावेळेस तिथीच्या क्षयवृद्धीमुळे 8 किंवा 10 दिवसाचे नवरात्र असू शकते.

नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुनः लावता येतो.

अष्टमीचे महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) करताना निशीथकाली म्हणजे रात्री साडेबारा ते दीड या वेळेत अष्टमी असलेला दिवस महालक्ष्मीपूजनासाठी घ्यावा असे आहे. त्यादिवशी सकाळी-दुपारी-सायंकाळी सप्तमी असू शकते. अशा सप्तमीवर पूजन करुन रात्रीची पूजा अष्टमीवर करावी.